
Friday, December 13, 2013
काटकसर केल्याने होणारे लाभ जाणा देवाच्या कृपेने मानवाला अनेक गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत. त्यांची उधळपट्टी टाळून आवश्यक तेवढाच वापर करणे, यालाच ‘काटकसर’ म्हणतात. मुलांनो, आई-बाबा तुम्हाला हव्या त्या वस्तू आणून देतात; म्हणून आज तुम्हाला पैशांचे इतके मोल वाटत नाही; परंतु मोठेपणी जेव्हा तुम्ही स्वतः पैसे कमवायला लागाल, तेव्हा तुम्हाला त्याचे खरे मोल कळेल. यासाठी ‘काटकसर’ या गुणाचा संस्कार तुमच्या मनावर आतापासूनच नको का व्हायला ? अ. काटकसर केल्याने होणारे लाभ १. राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण होणे :पाणी, वीज, पेट्रोल, डिझेल इत्यादी राष्ट्रीय संपत्ती आहे. तिचा काटकसरीने वापर केल्यास राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण होते. २. निसर्गाचा समतोल राखला जाणे :सध्या वृक्षांची अमाप तोड झाल्याने निसर्गाचा समतोल ढासळला आहे. त्यामुळे पर्जन्यमान घटणे, उष्मा वाढणे इत्यादी समस्या निर्माण झाल्या आहेत. कागदासारखी गोष्ट काटकसरीने वापरली, तर वनसंपत्तीची बचत होईल आणि निसर्गाचा समतोलही ढासळणार नाही. आ. स्वतःमध्ये काटकसर हा गुण आणण्यासाठी पुढील गोष्टींचा वापर करावा आ १. पाणी १. तोंड धुणे, आंघोळ करणे, कपडे आणि भांडी धुणे यांसारख्या कृती करतांना आवश्यक नसेल, तेव्हा नळ बंद करावा. २. पाणी घेऊन झाल्यावर ‘नळ नीट बंद केला आहे ना’, याची निश्चिती करावी. ३. काही जण पाणी पिण्यासाठी भांडे पूर्ण भरून घेतात आणि त्यातील थोडेसे पाणी पिऊन उरलेले पाणी फेकून देतात. त्यामुळे पाणी वाया जाते. हे टाळण्यासाठी पिण्यासाठी आवश्यक तेवढेच पाणी भांड्यात घ्यावे. आ २. वीज १. कोणाचा वावर नसलेल्या खोलीतील पंखे आणि दिवे बंद करावेत. २. खोलीतील सर्व पंखे आणि दिवे ‘खरंच चालू ठेवणे आवश्यक आहे का’, याची निश्चिती करावी. ३. स्नानगृह किंवा शौचालय यांतून बाहेर आल्यावर तेथील दिवा आठवणीने बंद करावा. ४. दूरदर्शनसंच (टीव्ही), आकाशवाणी संच (रेडिओ), संगणक(कॉम्युटर) इत्यादी विजेची उपकरणे विनाकारण चालू ठेवू नयेत. आ ३. साबण १. कपडे धुणे, भांडी घासणे आणि आंघोळ करणे यांसाठी साबणाचा अतिरिक्त वापर टाळावा. २. साबणाच्या वडीचा वापर करून झाल्यानंतर ती उभी करून निथळत ठेवावी. त्यामुळे त्या वडीची झीज अल्प होईल. ३. शेष राहिलेल्या साबणाचे तुकडे एकत्र करून ते हात धुणे, कंगवे स्वच्छ करणे आणि लादी धुणे यांसाठी वापरावेत. आ ४. कागद १. शाळेच्या वह्यांची पाने फाडणे, पानांवर रेघोट्या मारणे, वहीची मधली पाने कोरी ठेवणे आदी गोष्टी टाळाव्यात. २. होडी किंवा विमान बनवण्यासाठी वहीतील कोरी पाने न वापरता निरुपयोगी (रद्दी) कागद वापरावा. ३. पाठकोरे कागद टाकून न देता ते एकत्रित करून कच्च्या लिखाणासाठी वापरावेत. ४. वरच्या वर्गात गेल्यावर गतवर्षीच्या वह्यांतील कोरी पाने काढून त्यांची नवीन वही बनवावी. अशा वहीचा वैयक्तिक लिखाणासाठी वापर करावा. आ ५. पैसे १. पेन, पेन्सील, खोडरबर, रंगपेटी, चपला इत्यादी वस्तू नवीन घेतांना, आधीच्या वस्तूंचा पूर्ण वापर झाला आहे का, हे पहावे. त्या वस्तू वापरण्यासारख्या असल्यास नवीन वस्तू विकत घेऊ नयेत. २. उसवलेले कपडे टाकून देण्यापेक्षा ते योग्य प्रकारे शिवून अधिक काळ वापरावेत. ३. जुन्या कपड्यांचा कंटाळा आल्याने नवीन कपडे विकत घेतले, तर जुने कपडे टाकून न देता निर्धन (गरीब) मुलांना द्यावेत. ४. दप्तर, कंपासपेटी यांसारख्या वस्तू जपून आणि व्यवस्थित हाताळाव्यात. त्यामुळे त्या वस्तू ४-५ वर्षेही वापरता येतात. ५. पाठ्यपुस्तके वर्षभर नीट वापरून ती पुढील वर्षी पाठच्या भावंडांना किंवा निर्धन (गरीब) विद्यार्थ्यांनाद्यावीत. ६. नवीन वस्तू विकत घेतांना ‘त्या वस्तूची खरोखरच किती आवश्यकता आहे’, याचाही विचार करावा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा