WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Saturday, January 11, 2014

यावर्षी शाळा सुरु होताना शाळांपुढची आव्हाने स्पष्ट आहेत. मागील काही वर्षात जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या १ लाख १८ हजाराने कमी झाली आहे. यावर्षी आकडेवारीत खाजगी शाळांची विद्यार्थीसंख्या सरकारी शाळांपेक्षा जास्त दिसते आहे. माझ्यासकट हजारो पालक सी.बी.एस.ई. च्या अभ्यासक्रमाला पसंती देत आहेत. प्रशासनातली अनागोंदी, भ्रष्टाचार, राजकिय हस्तक्षेप, संघटनांचे राजकीयीकरण हे सारे मुद्दे अधिकच गहिरे करीत आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षणातील प्रश्न मांडतच राहावे लागतील, गुणवत्तेबद्दल आग्रही राहावे लागेल, पण इथून पुढे एकाच वेळी दोन पातळीवर मांडणी करावी लागेल. एकाच वेळी धोरणात्मक निर्णय, प्रशासकीय सुधारणा, शिक्षक सेवापूर्ण प्रशिक्षण, त्याचा दर्जा याबाबत बोलताना आज सेवेत असलेल्या शिक्षकांना प्रेरणा देण्याविषयी , त्यांच्यातील उपक्रमशीलता वाढविण्यासाठीही मांडणी करावी लागेल. प्राथमिक शिक्षणातील गुणवत्तेच्या पाहण्या जे विदारक चित्र उभे करतात त्याचे विश्लेषण करताना असे लक्षात येते की, या शिक्षणव्यवस्थेत आज शिक्षकांमध्ये प्रेरणा रुजविली जाईल अशी स्थिती उरली नाही. ज्ञानाधारित रचनेला, उपक्रमशीलतेला प्रतिष्ठा मिळत नाही. उपक्रमशील शिक्षक बाजूला पडून राजकीय व्यवस्थेशी निगडित शिक्षक हाच जणू शिक्षकाचा चेहरा असे चुकीचे चित्र समोर येत आहे. वास्तविक शिक्षकाचे रोजचे काम अधिक चैतन्यदायी कसे होईल, त्याला आनंद देणारे व प्रेरणा देणारे कसे करायचे हे खरे आजचे आव्हान आहे. विविध योजनांमुळे, वाढत्या कागदपत्रांमुळे शिक्षक आज वैतागला आहे. त्यामुळे तो कामात रमत नाही. आपल्यापेक्षा वयाने खूप लहान असलेल्या मुलांसमोर वर्षानुवर्षे बोलत राहणे, एकाच वर्गात पाचच तास एकाच प्रकारचे काम करत राहणे हे मुळातच अनैसर्गिक आहे. हे काम व्याख्यान पद्धतीने अधिकच कंटाळवाणे होते. तेव्हा मुख्य प्रश्न वर्गातील वेळ, काम अधिक आनंददायी कसे होऊ शकेल हा आहे. नोकरीची वर्षे जशी वाढत जातील तसा कंटाळा न येण्यासाठी काय करायचे, आजूबाजूच्या निराशाजनक वातावरणात स्वत:वर परिणाम न होऊ देता प्रेरणा कशी शोधायची , पुरस्कार, बदल्या, राजकीय हस्तक्षेप याचाही परीणाम न होऊ देता काम कसे करायचे याबाबत आज शिक्षकांशी संवादाची गरज आहे. शिक्षणव्यवस्थेत अपेक्षित अत्यावश्यक बदल होतील तेव्हा होतील, पण आज शाळेवर वाडीवस्तीवर काम करणाऱ्या शिक्षकाने काय करायला हवे ? त्याने सर्वप्रथम निराश करणाऱ्या सर्व बातम्या, घटना, प्रशासनाकडून येणारे अनुभव हे सारे विसरून जाण्याची, दुर्लक्ष करण्याची मनोभूमिका करायला हवी तरच त्याच्यातील सकारात्मकता वाढीस लागेल. बरेच शिक्षक या नकारात्मकतेचे भांडवल करत स्वत:च्या क्रियाशील नसण्याचे समर्थन करतात. " मी संपूर्ण शिक्षणाचे चित्र बदलू शकणार नाही, पण किमान माझ्या शाळेचे चित्र मी बदलू शकेन, " एवढा संकल्प नव्या वर्षासाठी करायला हवा. शेवटी ज्या पेशात ३० वर्षे घालवायची ते काम आनंदी कसे होईल असेच प्रयत्न करायला हवे. स्कॉलरशीपमध्ये विद्यार्थी येणे हा गुणवत्तेचा खूप संकुचित अर्थ आहे. हॉवर्ड गार्डनरने बुद्धिमत्तेचे आठ प्रकार सांगितले आहेत. *.भाषिक बुद्धिमत्ता *.गणिती बुद्धिमत्ता *.सांगितिक बुद्धिमत्ता *.अवकाशिय बुद्धिमत्ता *.शारीर बुद्धिमत्ता *.आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता *.व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता *.निसर्ग विषयक बुद्धिमत्ता या सर्व बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी अध्यापनाची रचना करणे म्हणजे उपक्रमशीलता. या सर्वच बुद्धिमत्ता आता समपातळीवर विकसित करुया. बऱ्याचदा उपक्रमशीलता याचा अर्थ काहीतरी मोठा कार्यक्रम आयोजित करणे समजले जाते. पण शाळा रंगविणे, झाडे लावणे, खतनिर्मिती, कंपाऊंड वॉल म्हणजे उपक्रमशीलता नव्हे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रकारच्या बुद्धिमत्तेला चालना देणे म्हणजे उपक्रमशीलता. आनंददायी शिक्षण म्हणजे केवळ गाणी, गोष्टी, आणि मराठी गणित इंग्रजी हे विषय वेगळे असे नाही. तर गाणी, गोष्टींइतकाच आनंद आपण गणित, इंग्रजी शिकवतानाही देऊ शकलो पाहिजे. प्रत्येक विषय तितक्याच नाट्यपूर्ण रितीने शिकवला, नवीन कल्पना वापरल्या तर ती विषयातील उपक्रमशीलता होईल. प्राथमिक शाळेतील शिक्षक हा जर बहुरुपी कलावंत होऊ शकला तर, मुलांचे जगणे बदलू शकेल. प्रत्येक शिक्षकाला किमान २५ गाणी, १०० गोष्टी, ५० कोडी, ५० विनोद, १० जादूचे प्रयोग, २० कागदी वस्तू तयार करणे, इतर भाषेती गाणी अवगत असली पाहिजेत, तरच तो विद्यार्थीप्रिय होतो. व मुलांमधील बुद्धिमत्ता विकसित होवू शकतात. चला नव्या शैक्षणिक वर्षात आपली शाळा बदलण्याचा संकल्प करु या. ( मा. हेरंब कुलकर्णी यांच्याकडून साभार )

इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०